Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १५ मे, २०२६
शिरपूर हादरलं! पत्नीसमोर अपमान केल्याच्या रागातून मुलाकडून आई-वडिलांची निघृण हत्या
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहर आज एका थरारक आणि मन हेलावून टाकणाऱ्या दुहेरी हत्याकांडाने हादरून गेले आहे. महावीर सोसायटी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीती, संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. पत्नीसमोर अपमानास्पद बोलल्याचा राग मनात धरून एका मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आई-वडिलांची मुसळाने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंदाराम महतो आणि रंजुदेवी इंदाराम महतो हे आपल्या मुलीचे लग्न आटोपून घरी परतले होते. लग्न समारंभानंतर घरात काही कारणावरून कौटुंबिक वाद निर्माण झाला. या वादादरम्यान आरोपी चंदन इंदाराम महतो याला पत्नीसमोर अपमानित केल्याची भावना झाली. त्यातून संताप अनावर झालेल्या आरोपीने घरातील मुसळ उचलून आई-वडिलांच्या डोक्यावर सपासप वार केले.
या भीषण हल्ल्यात इंदाराम महतो आणि रंजुदेवी महतो यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दाम्पत्याला पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजित जाधव तसेच पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
या घटनेमुळे महावीर सोसायटी परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. “ज्यांनी जन्म दिला, त्यांचाच जीव घेण्याइतका क्रूरपणा मुलामध्ये कसा निर्माण झाला?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, पोलिसांकडून आरोपी चंदन इंदाराम महतो याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गंभीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, कौटुंबिक वाद, मानसिक ताणतणाव आणि घटनेमागील नेमके कारण याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
या हृदयद्रावक घटनेने शिरपूर शहर सुन्न झाले असून, एका क्षणाच्या संतापाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा