Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३ जून, २०२६

म्हसावद अंगणवाडी प्रकल्पात साडेतीन हजारांची कथित वसुली; बंद करण्यात आलेल्या ११ रजिस्टरच्या नावाखाली लाखोंचा आर्थिक व्यवहार?



शाहदा, प्रतिनिधी : महिला व बालविकास विभागाच्या २५ मे २०२६ रोजीच्या पत्रानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमधील ११ रजिस्टर पूर्णपणे बंद करून सर्व माहिती ‘पोषण ट्रॅकर’ प्रणालीवर नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या आदेशानंतरही शाहदा तालुक्यातील म्हसावद अंगणवाडी प्रकल्पात ११ रजिस्टर खरेदीच्या नावाखाली प्रत्येक अंगणवाडी सेविकेकडून सुमारे साडेतीन हजार रुपये जमा करून घेण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

विशेष म्हणजे, संबंधित रजिस्टरसाठी रक्कम गोळा करूनही ती अद्याप अंगणवाडी सेविकांना वितरित करण्यात आलेली नसल्याची तक्रार पुढे आली आहे. त्यामुळे शासनाने बंद करण्याचे आदेश दिलेल्या रजिस्टरसाठी निधी का आणि कोणाच्या आदेशाने गोळा करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्राप्त तक्रारीनुसार, रजिस्टर खरेदीसाठी महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद प्रशासन, मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची कोणतीही लेखी परवानगी किंवा आदेश आहेत का, याबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे. असे आदेश अस्तित्वात असल्यास ते सार्वजनिक करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित मुख्य सेविका व पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक वसुली करण्यात आल्याची चर्चा असून, या व्यवहाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविकांकडून रक्कम जमा करण्यात आली असल्यास हा आर्थिक व्यवहार लाखो रुपयांच्या घरात गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रजिस्टर खरेदी प्रक्रिया, निधी संकलन, जमा झालेल्या रकमेचा वापर आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका याबाबत स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी तक्रारदारांनी केली आहे.
या प्रकरणी समाधानकारक स्पष्टीकरण अथवा कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शासनाने बंद करण्याचे आदेश दिलेल्या ११ रजिस्टरच्या नावाखाली निधी संकलन झाल्याच्या आरोपांमुळे म्हसावद अंगणवाडी प्रकल्पातील हा प्रकार अधिक गंभीर मानला जात असून, प्रशासन या प्रकरणाची चौकशी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध