Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ ऑगस्ट, २०२६
Home
/
/
जानोरीत १०८चा ‘बोंबाबोंब’! अपघातग्रस्त तडफडत राहिला, रुग्णवाहिका मात्र गायब, चारही १०८ उपलब्ध नसल्याचा दावा; दोन नादुरुस्त, दोन रुग्ण घेऊन गेल्या म्हणे! अर्धा तास फोनवर प्रतीक्षा, अखेर खासगी वाहनाचा आधार
जानोरीत १०८चा ‘बोंबाबोंब’! अपघातग्रस्त तडफडत राहिला, रुग्णवाहिका मात्र गायब, चारही १०८ उपलब्ध नसल्याचा दावा; दोन नादुरुस्त, दोन रुग्ण घेऊन गेल्या म्हणे! अर्धा तास फोनवर प्रतीक्षा, अखेर खासगी वाहनाचा आधार
संदीप अवधूत :-
आपत्कालीन सेवा म्हणायची आणि ऐनवेळीच गायब व्हायचे, तर मग १०८चा उपयोग काय? दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे शनिवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने आरोग्य व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिखलमय रस्त्यावर मोटारसायकल घसरून अपघात झाला. अपघातात गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात हलविणे गरजेचे होते. मात्र, मदतीसाठी धावून येणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेलाच जणू ‘व्हेंटिलेटर’ची गरज भासली!
स्थानिक नागरिक संदिप गुंजाळ यांनी तातडीने १०८ क्रमांकावर फोन केला.१५-२० मिनिटे फोनवर प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. तब्बल अर्धा तास उलटूनही ‘वेटिंग’च! अखेर जखमीचा जीव धोक्यात घालून बसण्यापेक्षा नागरिकांनी खासगी वाहनाची व्यवस्था करून त्याला रुग्णालयात हलविले.
*चारही रुग्णवाहिका कुठे? उत्तरांमध्येच गोंधळ!*
दिंडोरी,ओझर,पिंपळगाव आणि आडगावनाका येथील चारही १०८ रुग्णवाहिका रुग्ण घेऊन गेल्याचे कॉल सेंटरकडून सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष स्थितीची खात्री करण्यासाठी विचारणा केली असता दोन रुग्णवाहिका नादुरुस्त असून दोन रुग्ण घेऊन गेल्या असल्याचे सांगण्यात आले.
मग प्रश्न सरळ आहे—आपत्कालीन परिस्थितीत प्रत्यक्षात उपलब्ध रुग्णवाहिका किती? आणि नादुरुस्त असलेल्या रुग्णवाहिका सेवेत दाखवल्या जात असतील,तर त्याचा हिशेब कोण देणार?
*४६ रुग्णवाहिका; पण आपत्कालीन वेळी एकही उपलब्ध नाही?*
वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर जिल्ह्यात सुमारे ४६ रुग्णवाहिका असून त्या १२ वर्षांपेक्षा अधिक जुन्या असल्याची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला. जर ही माहिती खरी असेल, तर शासनाच्या आरोग्य व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहते.
रुग्णवाहिका रुग्णांना वाचवण्यासाठी असतात की त्या स्वतःच ‘रुग्ण’ होण्याची वाट पाहत आहेत? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
कुंभमेळ्यापर्यंत नवीन रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन दिले जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, तोपर्यंत एखाद्या गंभीर रुग्णाला १०८ मिळाली नाही आणि वेळेत उपचार न मिळाल्याने अनर्थ झाला, तर त्याची जबाबदारी कोणाची?
*आरोग्यमंत्र्यांचा दौरा आणि त्याच वेळी १०८चा ‘पंचनामा’!*
विशेष म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच ही घटना घडली. आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला जात असताना त्याच जिल्ह्यात एका गंभीर अपघातग्रस्तासाठी १०८ उपलब्ध होत नसेल, तर दौऱ्यात दाखविले जाणारे आरोग्यसेवेचे चित्र आणि जमिनीवरील वास्तव यात एवढी तफावत का?
फलकांवर सेवा,भाषणांत सुविधा आणि प्रत्यक्षात ‘रुग्णवाहिका उपलब्ध नाही’—हा आरोग्य व्यवस्थेचा नवा चेहरा आहे का?
‘१०८ फक्त नावाला ठेवायची असेल तर बंद करा!’
“मी स्वतः १०८ रुग्णवाहिकेसाठी फोन केला. साधारण अर्धा तास प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. शेवटी खासगी वाहनाने जखमीला रुग्णालयात पाठवावे लागले. १०८ सेवा जर परिपूर्ण सेवा देत नसेल आणि केवळ शोभेपुरतीच ठेवली असेल, तर असा देखावा करण्यापेक्षा ती बंद करावी. विशेष म्हणजे आरोग्यमंत्री दौऱ्यावर असतानाच त्याच ठिकाणी अशी अवस्था होत असेल, तर सामान्य नागरिकांनी नेमके कुणाकडे पाहायचे?”
— संदिप गुंजाळ,स्थानिक नागरिक
आता ‘दखल’ नको, थेट कारवाई हवी!
या घटनेची केवळ चौकशी करण्याची घोषणा न करता चारही १०८ रुग्णवाहिकांची त्या वेळची लोकेशन, त्यांची कार्यस्थिती, रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यास त्याची नोंद,कॉल लॉग आणि उपलब्धतेची वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी होत आहे.
कारण प्रश्न एका अपघातग्रस्ताचा नाही; प्रश्न हा आहे की संकटाच्या क्षणी १०८वर फोन करणाऱ्या सामान्य माणसाला मदत मिळणार तरी कुठून?
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा