Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २१ जुलै, २०२१

शिरपूर तालुक्यातील घरकुल बाबत सरपंच महासंघाचे आमदारांना निवेदन..!



शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील घरकुल 'ब' यादीतील लाभार्थ्यांना मागील ५ महिन्यापासून घरकुलाचे हप्ते मिळाले नाहीत तसेच घरकुल 'ड' यादीचे कामे तालुक्यात लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आमदार श्री काशिराम पावरा यांना शिरपूर तालुका सरपंच महासंघा तर्फे निवेदन देण्यात आले.

ग्रामीण भागात रमाई, शबरी, पारधी, प्रधानमंत्री आवास अशा विविध योजना अंतर्गत घरकुले मंजूर होतात. शिरपूर तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये 'ब' यादीतील घरकुलाचे कामे चालू आहेत परंतु बऱ्याच लाभार्थ्यांना त्यांचे घरकुलाचे हप्ते काही महिन्यांपासून मिळाले नाहीत ज्यामुळे त्यांचे घरकुले अपूर्णावस्थेत आहेत म्हणून घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरकुल प्रवेश करता येत नाही. तसेच बरेच ग्रामस्थ घरकुल 'ड' यादीच्या प्रतिक्षेत आहेत. हक्काचे घरकुल मिळेल या आशेने काही ग्रामस्थ झोपडीत तर काही भाडयाच्या घरात राहत आहेत. आता पावसाळ्यात ग्रामीण भागातील मातीच्या घरांना गळती लागली आहे म्हणून घरकुल 'ड' यादीचे कामे लवकरात लवकर चालू व्हावे अशी मागणी ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे. 

सरपंच सेवा महासंघ शिरपूर तर्फे आमदारांना विनंती करण्यात आली कि, शासन दरबारी घरकुल 'ड' यादीतले घरकुल कामे लवकर चालू करण्याबाबत विचारणा करण्यात यावी तसेच घरकुल 'ब' यादीतले थकीत हप्ते लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी मदत करावी म्हणून आज तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सरपंच/उपसरपंच व महासंघाचे पदाधिकारी यांनी आमदारांची भेट घेतली. तालुक्यातील सरपंचांना आमदारांनी आश्वासन दिले कि घरकुल थकीत हप्त्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांशी बोलतो व 'ड' घरकुल यादी बाबत मुंबई गेल्यावर पाठपुरावा करून हा प्रश्न लवकर मार्गी लावू असे सांगितले. आमदार श्री काशिराम पावरा यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याबद्दल शिरपूर तालुका सरपंच महासंघ तर्फे आमदारांचे आभार मानण्यात आले. 

निवेदन देतेवेळी सरपंच महासंघाचे तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, महिलाध्यक्ष प्रियंका पावरा, उपाध्यक्ष  राजेंद्र पाटील, कार्याध्यक्ष रोशन सोनवणे, कोषाध्यक्ष नाना वाघ, वाघाडी लोकनियुक्त सरपंच सौ उज्वला प्रतापराव पाटील, वनावल सरपंच सौ भावना मनोहर देवरे, हिंगोणी सरपंच सोमा भिल, सावळदा उपसरपंच सचिन राजपूत, बाळदे सरपंच निंबा तोताराम पाटील, रुदावली सरपंच पितांबर पाटील, जातोडा सरपंच सौ रत्नाबाई रावसाहेब धनगर, उपसरपंच दर्यावसिंग राजपूत, हिंगोणी उपसरपंच विनोद पाटील, महासंघ तालुका संपर्क प्रमुख शिंगावे उपसरपंच चंद्रकांत पाटील, धुडकु भिल, दिलीप धनगर व तालुक्यातील ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध