Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

जळगाव आरटीओ कार्यालयात घडल्याने राज्यात मोठी खळबळ..!भुसावळचे आमदार संजय सावकारेंची चारचाकी परस्पर केली मंत्री अनिल परबांच्या नावावर..!



जळगाव प्रतिनिधी : कधी लाच प्रकरण तर कधी वाहन धारकांच्या अडवणुकीमुळे चर्चेत आलेल्या जळगाव आरटीओ कार्यालय आता नवीन प्रकारामुळे चर्चेत आले आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्याकडील इनोव्हा वाहन त्यांनी विक्री केलेले नसताना वा कुणालाही हस्तांतरण केलेले नसताना चक्क हे वाहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर हस्तांतरीत झाल्याचा प्रकार जळगाव आरटीओ कार्यालयात घडल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. वाहन खरेदी केल्यानंतर वा ट्रान्सपर करताना अधिकृत क्रमांकावर ओटीपी आल्यानंतर ही प्रक्रिया होते मात्र सावकारे यांना ओटीपी आला नसताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जळगाव आरटीओ कार्यालयातील तीन लिपिकांसह एआरटीओ यांच्या स्वाक्षरीने हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर वरीष्ठांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.

दोषींवर कारवाईची मागणी भुसावळचे आमदार संजय वामन सावकारे यांच्याकडे टोयोटा कंपनीची इनोव्हा (एम.एच.19 सी.झेड5130) असून ही गाडी त्यांनी अन्य कुणालाही विक्री वा ट्रान्सपर केली नसतांनाही त्यांच्या मालकीची गाडी जळगाव आरटीओ कार्यालयात शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 रोजी परस्पर परीवहन मंत्री अनिल दत्तात्रय परब यांच्या नावे केल्याची माहिती उघडकीस आली आहे. आमदार सावकारेंनी ही गाडी विक्री केली नसतांनाही मंत्री परब यांच्या नावाने नोंदणी कशी केली गेली? असा सवाल उपस्थित होत असून या प्रकाराने आरटीओ कार्यालयाचा गलथानपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

यापूर्वी दिले होते मंत्र्यांच्या नावाने लायसन्स
यापूर्वीदेखील जळगाव आरटीओ कार्यालयातून मंत्र्यांच्या नावाने लायसन्स् दिले गेले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.असे असतांनाही आतातर चक्क,आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची गाडी परीवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर करून नोंदणी केली गेली आहे.

अधिकार्‍यांकडून गंभीर दखचल :कागदपत्रे केली ब्लॉक सूत्रांच्या माहितीनुसार,वाहन हस्तांतरण प्रक्रियेदरम्यान आमदारांच्या क्रमांकाऐवजी परस्पर दुसरा क्रमांक सॉप्टवेअरमध्ये फीड करण्यात आला व त्यानंतर हे वाहनाचे हस्तांतरण पार पडले.या गंभीर प्रकाराची कमिश्नर यांच्याकडून आता चौकशी केली जात असून या प्रकारात सहभागी असलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. संबंधित वाहनाचे कागदपत्रे ब्लॉक करण्यात आले असून हा प्रकार नेमका घडला कसा,या प्रकारात सहभाग एजंट, कर्मचारी,अधिकारी आदींची आता चौकशी होवून पुढील कायदेशीर कारवाई होण्याचे संकेत आहेत.

गाडी विक्री केलेली नाही : आमदार संजय सावकारे टोयोटा कंपनीची पांढर्‍या रंगाची (एम.एच.19 सी.झेड.5130) ही आपल्या मालकीची असून ती विक्री केली नसल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.या संदर्भात आरटीओ अधिकार्‍यांकडे तक्रार केली असून वरीष्ठ स्तरावरून या गंभीर प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आल्याचे आमदारांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध