Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

सलग तीन दिवस हिमालयात चालत ऐतिहासिक केदारकंठा स्नो ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण...


परंडा दि. ३१ तालुक्यातील शेळगाव येथील सनराईज इंग्लिश मेडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जोतीराम जगताप यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंडातील हिमालय पर्वतरांगांमध्ये असलेल्या केदारकंठा शिखरावर यशस्वी चढाई करताना २३ जणांचा चमू थरारक अनुभवातून गेला. -३°C ते -१८°C अशा प्रचंड थंड वातावरणात, सलग तीन दिवस बर्फाच्छादित पर्वतांवर प्रवास करत अखेर हा अद्वितीय ट्रेक पूर्ण करण्यात आला. विशेष म्हणजे, या चमूमध्ये २५ ते ५४ वर्षे वयोगटातील युवक सहभागी होते, त्यामुळे हा अनुभव अधिकच प्रेरणादायी ठरला. केदारकंठा हे १२,५०० फूट (३,८१२ मीटर) उंचीवर असलेले एक प्रसिद्ध ट्रेकिंग स्थळ आहे, जे विशेषतः हिवाळ्यात हिमाच्छादित स्वरूपात विलोभनीय दिसते. या शिखरावरून बंदरपुंच, स्वर्गरोहिणी, कालानाग आणि रांथोली यांसारखी हिमालयातील भव्य शिखरे स्पष्टपणे दिसतात.घनदाट देवदार आणि बुरांशच्या जंगलांमधून मार्ग काढत, बर्फाच्छादित पठारं पार करत अखेर चमू समिटवर पोहोचला. तिथून दिसणारा ३६०-डिग्री नजारा, बर्फाच्या शुभ्र चादरीने माखलेले पर्वत आणि निळ्याशार आकाशाचा नजारा हा आयुष्यभर स्मरणात राहील.या रोमांचक ट्रेकचे नेतृत्व युवा उद्योजक जोतीराम जगताप यांनी केले. हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी वंडरिंग गोट या कंपनीचे सीईओ मयुरेश जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चमूने हा ट्रेक यशस्वीरीत्या पार पाडला. उणे तापमान, उंचावरचा कमी ऑक्सिजन, बर्फामधील अवघड चढाई आणि थकवणारा प्रवास या सर्व आव्हानांना सामोरे जात, प्रत्येकाने चिकाटी, जिद्द आणि सहकार्याच्या जोरावर ही यात्रा पूर्ण केली. हा ट्रेक केवळ शारीरिक सहनशक्तीची कसोटी नव्हती, तर मानसिक जिद्दीचा देखील कठोर परीक्षा होती. कठीण हवामान, बर्फात चालण्याची कसरत आणि शारीरिक थकवा असूनही, सर्वांनी एकमेकांना प्रेरित करत हा रोमांचक ट्रेक पूर्ण केला.या अद्वितीय अनुभवातून निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूती मिळाली तसेच आत्मविश्वास आणि ध्येयप्राप्तीच्या जिद्दीला नवी प्रेरणा मिळाली. ही यात्रा कायम प्रेरणादायी ठरेल!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध