Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २७ डिसेंबर, २०२१



 विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, सभागृहात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान आतापर्यंत सुमारे 35 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन हे 22 डिसेंबरपासून सुरू झाले असून, आतापर्यंत सुमारे 2 हजार 300 कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात आतापर्यंत 35 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यात पोलिस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून, आतापर्यंत 35 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, 3 पत्रकार, पोलिस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक देखील केली जाणार आहे. त्यामुळे सभागृहात आणखीणच गर्दी होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
आजपासून रोज कोरोना टेस्ट
हिवाळी अधिवेशनादरम्यान आतापर्यंत सुमारे 35 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर आता आजपासून रोज कोरोना चाचणी केली जाईल. असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, "गर्दी वाढली आहे. ख्रिसमस न्यू-ईयर असताना लोक काळजी जास्त घेत नाहीत. प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे आहे. लसीकरण झाल्यावरही मास्क घालावे लागणार आहे. वातावरण भीतीचे आहे. शाळा कॉलेज संदर्भातील निर्णय पुढील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे. शाळांसंदर्भात हा आठवडा झाल्यावर पुढच्या आठवड्यात निर्णय घेऊ, सध्या आम्ही परिस्थिती पाहतोय." तसेच पुढे बोलताना विधिमंडळ परिसरात प्रवेश करताना आजपासून डेली टेस्ट करावी लागणार आहे, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत आदित्य ठाकरेंचे सूचक वक्तव्य
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, "कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्रीच नाही तर सर्वांनी काळजी घ्यावी लागेल. कोविड परिस्थिती पाहून मुख्यमंत्री विधानभवनात येणार की, नाही हा निर्णय घेतील." तसेच प्रत्येकाच्या मनात कोविड होऊन गेला, लस घेतली आहे, त्यामुळे होणार नाही असा गैरसमज आहे. पण लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाही मास्क घालवाच लागणार आहे. तसेच ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले नाही, त्यांनी लस घेणे आणि मास्क लावणे गरजेचे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

 तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध